इंद्राच्या कोपापासून गावकर्याना वाचवणारा गिरीधर कितीतरी युक्ती प्रयुक्तींनी अज्ञानात असलेल्या त्या गोपजनांना जगण्याचं सार सोप्या भाषेतून, कृतीतून पटवून देतो। बायकांची ताक, दुध, लोणी या सारख्या साध्या ऐहिक गोष्टींवर असलेली आसक्ती सोडवण्यासाठी तो त्यांच्या घरचे लोणी, दूधदुभते चोरतो, मटकी फोडतो.नंद राजाचा मुलगा असूनही त्याला या सगळ्या गोष्टी काय मिळत नसतील? पण आपल्याजवळच आपलं प्रिय इतरांनाही वाटावं, कोणी उचनीच असू नये सर्वांनी मिळून मिसळून राहावं हे आजच्या काळातलं 'समाजवादी' तत्वही श्रीकृष्णाने मांडलं. हे शिकवण्यासाठीच कृष्ण गोपालकाल्यापासून गवळणींच्या खोड्या करण्यापर्यंत सारी कृत्ये करत असावा.
आपल्या घर संसारात कष्ट करणाऱ्या गोपिकांना निखळ, शाश्वत आनंदाची प्राप्ती करून देवासाठी त्यांनी आपल्या मुरलीच्या नादाचे वेड लावले। रासक्रीडेत तर प्रत्येकीला कृष्ण पूर्णवेळ आपल्याशीच खेळत होता असे वाटत असे. ही अत्यानंदाची अनुभुती मिळणार्या त्या किती धन्य असतील? कृष्णाने त्यांना सगुणावर प्रेम करायला शिकवलं हे मान्य. पण जी स्त्री संसारी कामकाजातच अडकली आहे. तिला तिच्या प्रिय अशा मुलबाळ गुर वासरं यापासून बाजूला नेऊन सगुणाचे का होईना ध्यान करावयास लावणे हे सोपे काम नव्हते. तो चतुर होता चाणाक्ष होता, कर्तव्यनिष्ठ होताच अन वेळ पडल्यास वज्राहूनही कठोर होणारा होता.
सांदिपनींच्या आश्रमात शिक्षण घेताना इतरांप्रमाणेच त्यांनी गुरुगृही काम केले व शेवटही एका सामान्य माणसाप्रमाणे मृत्यू पत्करून आपले अवतार कार्य संपवले. त्यामुळेच तो देव की मानव या वादात अडकण्यापेक्षा त्याने दिलेली शिकवण अंगिकारली तर आपला 'नारायण' व्हायला उशीर होणार नाही.
