मकर संक्रांत

आपल्या उत्सवप्रिय देशात प्रत्येक सणाची एक खासीयत आहे. कोणत्याही सणाचं नाव घेतलं की त्याच्याशी निगडीत गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर येतात. मकर संक्रांत म्हणताच तिळगूळ, गव्हाची खिचडी, तीळ घातलेली भाकरी हा स्वाद जिभेवर तरळू लागतो.
सूर्याने एका राशीतून दुसर्‍या राशीत जाणे म्हणजे 'संक्रमण करणे'. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यामुळे या सणाला 'मकरसंक्रांत' असे म्हणतात. या दिवशी सूर्य पृथ्वीची परिक्रमा करण्याची दिशा बदलवतो. म्हणजेच सूर्य थोडा उत्तरेकडे झुकतो. यामुळे या वेळेला उत्तरायण असेही संबोधतात. सूर्याच्या संक्रमणासोबतच जीवनाचे संक्रमण जोडले आहे. यामुळे या उत्सवाला सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्व आहे.