कहाणी श्रावणी सोमवरच्या शिवमुठीची

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या. एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी, नावडतीस जेवायला उष्टं, नेसायला जाडंभरडं, रहावयाला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास आला. पहिला सोमवार आला. ती रानी गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई, कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. त्यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलंबाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ति होते, मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमचे बरोबर येते! त्यांचे बरोबर देवळात गेली.
नागकन्या, देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय गं बायांनो वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो, त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, दोन बेलची पानं घ्यावी, मनोभावं पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडा नं शिवा शिवा, महादेवा, माझी शिवामूठ, ईश्वरादेवा, सासूसासर्‍या, दिरभावा, नणंदजावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा? असं म्हणून तांदूळ वाहवेत.
संध्याकळपर्यंत उपवास करावा उष्टंमाष्टं खाऊ नये, दिवसा निजू नये. उपास नाही निभवला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पाच वर्षं करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसर्‍यास तीळ, तिसर्‍यास मूग, चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावे.

पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या-देवकन्यांनी दिलं आणि दुसर्‍या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला. जावानणंदांनी उष्‍टंमाष्टं पान दिलं, ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला, ‍नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा, महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरदेवा, सासूसार्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा! असे म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासूसार्‍यांनी विचारलं, तुझा देव कुठं आहे?

नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाट कठीण आहे, काटेकुटे आहेत, साप, वाघ आहेत. तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते तुझा देव दाखव. म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही. ह्यांना काटेकुटे पुष्‍कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानांत कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्यांसहवर्तमान देऊळ सुवार्णांच झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हंड्या, झुंबरं लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा, शिवा, महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरदेवा, सासूसार्‍या, दिराभावा, नणंदजावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला ‍वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पहायला गेला. नावडतीची पूजा झालीं. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं.

राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं, देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाजा हाच देव, मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला, म्हणून तिला पालखीत घालून घरी आणल. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला. ‍तसा ‍तुम्हां होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.