
चैत्राची सुरवात ... तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे.
तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी. हा ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो.
चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. आपली घरेदारे सजवली (सोन्यामाणकांसारख्या वैभवसंपन्न रत्नांनी पूर्ण अयोध्या सजली होती अशी वर्णने वाचायला मिळतात.)
त्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघात आहे. कारण कडुनिंब औषधी आहेच पण रसांसमवेत (आंबट, तुरट, तिखट यासारखा) याचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे.
वर्षाच्या सुरवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून टाकून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करा असे तर ही प्रथा सांगत नसेल?कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करतात. कारण उन्हाळ्यात होणार्या त्वचारोगापासून बचाव करण्याचे सामर्थ्यही ह्यात आहे.