जागतिक ‍महिला दिन

सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली केली, त्यांचे ऋणही व्यक्त केले जात नाहीत. महिलाच्या अधिकारासाठी ज्यांनी संघर्ष केला, स्वत:चे जीवन खर्ची घातले, सरकार, समाज तसेच पुरूषप्रधान संस्कृतीशी प्रचंड संघर्ष करून एक उज्ज्वल भविष्य आपल्याच भगिनींच्या ओटीत घातले, अशांचेच या प्रसंगी विस्मरण होताना दिसते आहे. महिला मंडळे, महिलांचे क्लब मात्र किटी पार्टी आयोजनात वर्षभर दंग असतात. महिला दिनी प्रेरणात्मक कार्यक्रमाऐवजी उत्सवी आयोजनावरच त्यांचा भर दिसून येतो. आपला कार्यक्रम इतरापेक्षा कसा चांगला होईल, अशी चुरस महिला मंडळांमध्ये निर्माण होते. जागतिक ‍महिला दिन कशासाठी साजरा करायचा? आम्हाला त्याची काय आवश्यकता? असे प्रश्न विचारणार्‍या महिलाही या पुढारलेल्या समाजात आहेत.

पुरूषाच्या तुलनेत महिलाना किमान प्राथमिक अधिकार तरी प्राप्त व्हावे, यासाठी ज्या थोर महिलांनी प्रचंड संघर्ष करून महिलाना अधिकार मिळवून दिले, त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा हा दिवस आहे. त्यांनी केलेल्या महान कार्यातून प्रेरणा घेण्याचा हा दिवस आहे. या दिवशी समाजातील महिला संघटनांनी एकत्र येऊन समाजातील मागे राहिलेल्या महिलाचा विकास करण्‍याचा संकल्प करण्‍याचा हा दिवस आहे. मात्र समाजातील महिलाच्या दयनीय अवस्थेकडे पहायला महिलांनाच वेळ नाही.

यातल्या अनेक महिलांना आपल्यासाठी कोणते अधिकार असतात, हेच जर त्यांना ना माहीत नाही, त्या महिला काय संघर्ष करणार? महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागात राहणार्‍या महिलाना 'जागतिक महिला दिन' ही काय भानगड आहे हेच माहित नाही, इतक्या त्या 'दीन' आहेत. महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या सातपुड्याच्या डोंगराईत अतिशय मागासलेले जीवन जगत आहेत. या महिला शिक्षणापासूनच काय तर सगळ्यात गोष्टीपासून तुटल्या आहेत.
PRPR